महत्त्वाच्या बातम्या

प्रताप सरनाईकांवर टीका करताना नरेंद्र मेहतांची जीभ घसरली; मिरा-भाईंदरमध्ये नवा वाद

मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या थकीत देयकां बाबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपां दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि वैयक्तिक टीका केली आहे. सरनाईक यांच्यावर निशाणा साधताना मेहता यांनी ‘सठिया गये, बूढे हो गये’ अशी वादग्रस्त टिप्पणी करत त्यांना चांगल्या डॉक्टरांकडून उपचाराचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, यामुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

         मिरा-भाईंदरमधील शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय वैर जुनेच आहे. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने शाब्दिक युद्ध रंगत असते. मात्र, हा वाद आता व्यक्तिगत टीकेपर्यंत पोहोचल्याने वातावरण अधिकच तापले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी, मिरा-भाईंदर महापालिकेच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची थकीत देयके अदा करण्यासाठी महापालिकेची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याचा घाट सत्ताधारी भाजपकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. हा निर्णय पूर्णपणे खासगी फायद्यासाठी घेतला जात असून, याद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावाही त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केला होता. या आरोपांमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती.

    या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि एक वेगळाच दावा समोर आणला. सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्यासाठी कर्ज काढण्याचा असा कोणताही निर्णय नसून, वास्तविक पाहता प्रशासकीय राजवटीच्या काळात तत्कालीन महापालिका आयुक्त दिलीप ढोले आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीच हा निर्णय घेतला होता, असे मेहता यांनी स्पष्ट केले. याच चुकीच्या निर्णयामुळे आज महापालिका आर्थिक संकटात अडकल्याचा पलटवार त्यांनी केला.

      याच पत्रकार परिषदेत किंवा संवादा दरम्यान बोलताना मेहता यांची जीभ घसरली आणि त्यांनी सरनाईक यांच्यावर घणाघाती वैयक्तिक टीका केली. “मंत्री महोदयांना आता जुन्या गोष्टींचा आणि निर्णयांचा विसर पडला आहे. ते ‘सठिया गये, बूढे हो गये’ आहेत,” अशी आक्षेपार्ह टिप्पणी त्यांनी केली. एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडे विषयाची केवळ अर्धवट आणि चुकीची माहिती असून त्यांना विसर पडत असल्याने त्यांनी तातडीने चांगल्या डॉक्टरांकडून उपचाराची गरज असल्याचे उपरोधिक वक्तव्यही त्यांनी केले. मेहतांच्या या खालच्या पातळीवरील टीकेमुळे शिवसेना गोटातून तीव्र संताप व्यक्त होत असून, यावर शिवसेना पक्ष नेमकी काय कायदेशीर किंवा राजकीय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!