महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांत फेरबदल; १२ नवीन निरीक्षक दाखल, ६ जणांची बदली

पिंपरी: राज्याच्या पोलीस दलातील तब्बल १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंती व प्रशासनिक बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या व्यापक फेरबदलांचा मोठा प्रभाव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावरही पाहायला मिळत असून, विविध पोलीस घटकांमधून १२ नवीन पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली झाली आहे. यासोबतच आयुक्तालयातील दोन निरीक्षकांना अन्य घटकांमध्ये कार्यभार सांभाळण्यासाठी पाठवण्यात आले असून, आयुक्तालयांतर्गतच ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

      या नवीन बदलांनुसार, विविध ठिकाणांहून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमार शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर), गोताराम शेवाळे (ठाणे शहर), सोमनाथ जाधव (छत्रपती संभाजीनगर शहर) आणि अमोल गवळी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) यांचा समावेश आहे. यापैकी रवींद्र कदम यांची यापूर्वी सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली आदेशाधीन होती. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

      आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, तर विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तसेच, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत वर्णी लागली आहे. या नवीन नियुक्त्यामुळे औद्योगिक नगरीतील पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!