इंदूरच्या दाम्पत्याने केला एरोपोनिक तंत्राद्वारे केशरच्या शेतीचा यशस्वी प्रयोग
भारतात काश्मीरमध्ये केशरची लागवड केली जाते. देशात व जगात विविध पिकांच्या उत्पादनासाठी अनुकूल वातावरण, मातीचा प्रकार या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परंतु आता शेतीच्या नवीन तंत्रज्ञानामुळे अनुकूल वातावरण तयार करून कोठेही पिकाची लागवड करणे शक्य झाले आहे. याच आधुनिक शेतीच्या पद्धतीने प्रेरित होऊन इंदूर जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरी केशरची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी एरोपोनिक तंत्राद्वारे केशरची लागवड करण्यास सुरुवात केली. अनिल जैस्वाल हे इंदुर येथे साईकृपा कॉलनीत राहतात. त्यांनी आपल्या घराला मिनी कश्मीर बनवले आहे. केशरची फुले फुले असून धागे तयार होऊ लागले आहेत.
अनिल जैस्वाल यांनी शेती विषय बोलताना सांगितले की, आमचे कुटुंब पारंपारिक शेतीशी जोडलेले आहे. काही काळापूर्वी मी माझ्या कुटुंबासह कश्मीरला गेलो होतो. तेथे श्रीनगरहून पंपोरला जाताना आम्ही केशरची लागवड पाहिली. जो जगातील सर्वात महाग मसाला आहे. अनिल यांनी केशर लागवडीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करण्यासाठी एक खोली तयार केली असून त्याचे तापमान 8° ते 25° से दरम्यान ठेवले जाते. ही खोली 320 स्क्वेअर फुट असून त्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च आला.
त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पंपोर शहरातून केशरचे बल्ब (कोर्म्स) शेतीसाठी विकत घेतले आहेत. त्यासाठी त्यांना सात लाख रुपये खर्च आला. अनिल म्हणतात केशर बल्बची संख्या येत्या एक-दोन वर्षात वाढेल. त्यांनी सप्टेंबर मध्ये केसर लागवड करण्यास सुरुवात केली होती. यंदा त्यांना सुमारे दोन किलो केसरचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात सुमारे पाच लाख रुपये प्रति किलो दराने केशर विकले जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आठ लाख रुपये प्रति किलो पर्यंत किंमत पोहोचू शकते. अनिल यांना केशर विकत घेण्यासाठी लोकांचे फोन येऊ लागले असून ते हे केसर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विकण्याची तयारी करत आहेत.
