महत्त्वाच्या बातम्या

देशातील पहिला टनेल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू; एमआयटी-डब्ल्यूपीयूचा जिंदाल स्टेनलेससोबत करार

पुणे: देशातील वाढत्या आणि आधुनिक भूमिगत पायाभूत सुविधांच्या गरजा लक्षात घेता, शिक्षणाला प्रत्यक्ष उद्योगविश्वाच्या जोडणी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील नामांकित एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) आणि अग्रगण्य ‘जिंदाल स्टेनलेस’ यांच्यात टनेल इंजिनिअरिंग साठी एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिकृत सामंजस्य करार संपन्न झाला आहे. ‘स्टेनलेस स्टील टनेल आणि भूमिगत बांधकामासाठी शाश्वत, हरित व नाविन्यपूर्ण सामग्री’ असे या विशेष अभ्यासक्रमाचे नाव असून, या उपक्रमामुळे देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला सक्षम अभियंते मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

        आगामी तीन वर्षांच्या या करारांतर्गत विद्यार्थ्यांना बोगदा (Tunnel) बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, त्याची गंजरोधक क्षमता, आधुनिक डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन तसेच सामग्रीच्या जीवनचक्र खर्चाचे (Life-Cycle Cost) सखोल व व्यावहारिक ज्ञान दिले जाणार आहे. या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली असून, १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीत २५ विद्यार्थ्यांनी उत्साहात नोंदणी केली आहे. हा अभ्यासक्रम भविष्यातील भूमिगत प्रकल्पांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे.

हा महत्त्वपूर्ण करार संपन्न करताना जिंदाल स्टेनलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण खुल्बे, मधुर गुप्ता, संदीप सिंह यांच्यासह एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, डॉ. शांतिनी बोकील, डॉ. संदीप पोटणीस व डॉ. अभयसिंहा शेलाके आदी मान्यवर उपस्थित होते. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी, एमआयटीच्या प्राध्यापकांनी डॉ. संदीप पोटणीस यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील जाजपूर येथील जिंदाल स्टेनलेसच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली होती. तिथे त्यांनी स्टील उत्पादन, अत्याधुनिक ऑटोमेशन आणि गंजरोधक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. या अभ्यासपूर्ण सहकार्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत झाला आहे.

           भारताच्या भविष्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कुशल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली तरुण पिढी घडवणे गरजेचे आहे, या उद्देशावर भर देत या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष उद्योग जगताचा अनुभव मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अभियांत्रिकी शिक्षणात एक नवी क्रांती घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!