महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र गुन्हेगारीत यूपी-बिहारच्याही पुढे’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई: पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका १० वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणाऱ्या घटनेवरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून महायुती सरकार आणि गृहविभागावर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ शब्दांचा आणि आकडेवारीचा खेळ करत असून, प्रत्यक्षात कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्याही पुढे निघाल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

          माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी जुन्नरमधील घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्या सत्ताधारी आमदाराच्या गावात अशा प्रकारच्या जघन्य घटना घडत आहेत, त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट व हलाखीची झाली आहे, याची प्रचिती येते. याआधीही अधिवेशनात आपण हा मुद्दा गांभीर्याने मांडला होता. या दुर्दैवी घटनेनंतर आपण प्रत्यक्ष पीडित कुटुंबाची व संबंधित वकिलांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

         राज्यातील महिला आणि बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर ताशेरे ओढताना रोहित पवार पुढे म्हणाले की, “सातत्याने वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी समोर येत आहे, ज्यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्र गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पुढे चालला आहेपरंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ शब्दांचा आणि आकडेवारीचा खेळ करून या गंभीर समस्येवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.” सध्या पोलिसांचा मुख्य वापर सामान्य जनतेच्या रक्षणासाठी न होता व्हीआयपी, सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे, त्यामुळेच सर्वसामान्य घरातील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडण्याचे धाडस नराधमांमध्ये वाढले असून पोलिसांची व कायद्याची भीती पूर्णपणे संपल्याचा घणाघात त्यांनी केला.

       रोहित पवार यांनी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर ‘शक्ती’सारखा कठोर कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ घोषणा करून चालणार नाही, तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी ठोस व्यवस्था सरकारने उभी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राज्याच्या गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारने याबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!