महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात घरातून बेकायदा दारूविक्री; गुन्हे शाखेची धडक कारवाई

पुणे: पुणे शहरात प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मानवी वस्तीत आणि राहत्या घरात बेकायदेशीर पणे देशी-विदेशी दारूचा साठा करून तिची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका अवैध धंद्याचा गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील साईनगर भागात अचानक छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख २४ हजार ६३५ रुपयांच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, या धडक कारवाईमुळे शहरात विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

     अंकितकुमार सूरजन बिंद (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि आदित्य राजू शिंदे (रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक नेहमी प्रमाणे सिंहगड रोड परिसरात गस्त घालत असताना, हिंगणे खुर्दधील साई नगरमध्ये राहणाऱ्या अंकित कुमार बिंद याने आपल्या स्वतःच्या घरात बेकायदेशीर पणे मद्याचा साठा करून तो ग्राहकांना चढ्या भावाने विकत असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे आणि काटकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तत्काळ संबंधित घरावर छापा टाकला.

     पोलिसांनी घरात झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विविध ब्रँडच्या देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा हा संपूर्ण मद्यसाठा जप्त करून अंकित कुमार बिंद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला मित्र आदित्य शिंदे याच्या सोबत मिळून हा अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय भागीदारीत चालवत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्या आणि दोघांना पुढील कायदेशीर कारवाई साठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही यशस्वी कारवाई उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली असून, अशा प्रकारे घरगुती स्वरूपात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!