महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचा कापड उद्योग जागतिक पातळीवर नेणार; ‘फार्म टू फॉरेन’चा संकल्प

मुंबई: महाराष्ट्राच्या सुपीक मातीत पिकणारा कापूस आणि त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने आता थेट जगातील उच्चभ्रू फॅशन मार्केट आणि मॉलमध्ये झळणार आहेत. कापूस उत्पादना पासून ते जागतिक बाजारपेठे पर्यंतची संपूर्ण साखळी अधिक मजबूत करून महाराष्ट्राला जागतिक एक्सपोर्ट हब (Global Export Hub) बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘असोचेम’ (ASSOCHAM) च्या वतीने आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६’ या महत्त्वाच्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या स्वप्नाला भक्कम आधार देण्यासाठी राज्य सरकार ‘फाइव्ह एफ’ (5F) व्हिजनवर प्रभावीपणे काम करत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामध्ये फार्म ते फायबर (शेतापासून धागा), फायबर ते फॅक्टरी (धाग्यापासून कारखाना), फॅक्टरी ते फॅशन (कारखान्यातून फॅशन) आणि फॅशन ते फॉरेन (फॅशनमधून परदेश) असा सर्व समावेशक प्रवास निश्चित करण्यात आला आहे. याद्वारे राज्यातील कापूस, रेशीम, जूट आणि फळांचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक ‘टेक्सटाईल हब’ म्हणून असलेली ओळख आणि मुंबईला मिळालेला आर्थिक राजधानीचा दर्जा यामध्ये कापड गिरण्यांचे मोठे योगदान होते. याच ऐतिहासिक वारशाचा वसा पुढे चालवत नागपूरचा ‘पीएम मित्रा पार्क’ (PM MITRA Park) आणि ‘अमरावती टेक्स्टाईल क्लस्टर’ राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवी गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        केवळ उत्पादनात वाढ करून चालणार नाही, तर ते उत्पादन ‘ग्रीन’, ‘डिजिटल’ आणि ‘पारदर्शक’ असणे आजच्या काळात गरजेचे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, इचलकरंजी, सोलापूर आणि भिवंडीसह राज्यातील विविध भागांमध्ये ‘रेडीमेड गारमेंट क्लस्टर्स’ वेगाने उभारले जात आहेत. तसेच, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आधुनिक शिलाई प्रशिक्षणाशी जोडून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची ओळख असणारी पैठणी, कोल्हापुरी चप्पल यांसारख्या पारंपरिक उत्पादनांचा जागतिक विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील भायखळा येथील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर भव्य ‘टेक्स्टाईल, क्राफ्ट अँड कल्चरल म्युझियम’ उभारले जात असून यामुळे राज्याच्या सांस्कृतिक वारशाची मान जागतिक पातळीवर उंचावणार आहे.

       समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए (JNPA) बंदरासारख्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे आता राज्यातील उत्पादने अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचू शकतील, असा दावा त्यांनी केला. कापसापासून तयार होणाऱ्या धाग्यातून आपण केवळ कपडे विणत नसून, एका अर्थाने ‘विकसित भारताचे भविष्य’ विणत आहोत, असे सांगतानाच लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या नामांकित फॅशन शोरूम मध्ये लवकरच ‘मेड इन महाराष्ट्र’चा टॅग दिसेल, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेत व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोचॅमच्या विशेष वार्षिक अहवालाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते थाटात पार पडले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!