महत्त्वाच्या बातम्या

आसाम मधील करीमगंज चे नामांतर….टागोरांनी श्रीभूमी असे केले होते वर्णन

     आसाम मधील बराक खोऱ्यातील करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्री भूमी करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रवींद्रनाथ टागोर यांच्या सन्मानार्थ या जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे.100 वर्षांपूर्वी कवी गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी आसामच्या आधुनिक करीमगंज जिल्ह्याचे श्री भूमी म्हणजे महालक्ष्मीची भूमी असे वर्णन केले होते. खूप काळापासून ही नामांतरणाची प्रक्रिया सुरू होती ती मागणी आज पूर्ण झाली आहे.

करीमगंजचा इतिहास हा ब्रिटिश राजवटीशी जोडलेला आहे 1878 मध्ये सिल्हेट जिल्ह्याच्या अंतर्गत उपविभाग म्हणून करिमगंज  स्थापित केला होता. 1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान सिल्हेट जिल्हा पूर्व पाकिस्तानला देण्यात आला. परंतु करीमगंज  उपविभागातील साडेतीन  पोलीस स्टेशन क्षेत्र भारतात सामील करण्यात आले होते.1 जुलै 1983 रोजी करीमगंज  स्वतंत्र जिल्हा करण्यात आला होता. . आसामच्या दक्षिणेकडील जिल्ह्याचे जुने वैभव परत मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरमा यांनी सांगितले.  

इतिहासकार विवेकानंद महंत यांनी सांगितले आहे की, करीमगंजचे नाव मुहम्मद करीम चौधरी यांनी स्थापन केलेल्या बाजारावरून पडले होते. 19 नोव्हेंबर 1919 ला टागोर करीमगंजला गेले होते त्यावेळी त्यांनी या ठिकाणाला श्री भूमी असे म्हटले असे इतिहासकार सांगतात. करीम  नाव असामी किंवा बंगाली शब्दकोशात आढळत नाही तर श्री भूमीचा उल्लेख दोन्हीमध्ये आढळतो असे मुख्यमंत्री म्हणाले.  मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालेे. तब्बल 105 वर्षानंतर आसाम सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

 आसामचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवीत करणाऱ्या जनतेच्या दीर्घकालीन मागणीला मान्यता म्हणून हा बदल करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले व लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा दिसून येतील असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!