महत्त्वाच्या बातम्या

खारघरच्या SIR फॉर्मवरून अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक

मुंबई: खारघर मधील एका झेरॉक्स दुकानात हजारो SIR फॉर्म्स आढळल्याने आणि त्यांची बेकायदा झेरॉक्स काढण्याचे प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये जे घडले तसेच प्रकार आता महाराष्ट्रात सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, भाजपचे मते टिकवून ठेवण्यासाठी आणि इतर मतदार वगळण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात भाजपच्या एका युवा पदाधिकाऱ्यावर आरोप ठेवण्यात आला असून चार बीएलओंना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण मुद्यावरून सरकारला धारेवर धरत अमित ठाकरेंनी जनतेला रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.

        खारघर मधील दुकानात SIR फॉर्मची झेरॉक्स काढली जात असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत तीव्र विरोध दर्शवला होता, ज्यामुळे तिथे मोठा राडा झाला. यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी प्रशासनावर आणि शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शासनाकडून यांना फॉर्म दिले कोणी? हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. हे जे चालले आहे ते अत्यंत चुकीचे आणि दडपशाहीच्या मार्गावर जाणारे आहे. आज हे आपल्या समोर आले, असे किती प्रकार सुरू असतील याची कल्पना नाही,” असे ते म्हणाले. १५ वर्षांच्या कारभारावर ताशेरे ओढत, जनतेने आता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहिले पाहिजे आणि सरकारच्या मनमानी कारभारा विरोधात रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे, अन्यथा हे नेते केवळ सत्तेत बसून मज्जा पाहतील, असा इशारा त्यांनी दिला.

      या पत्रकार परिषदेत केवळ मतदार नोंदणी प्रकरणावरच नव्हे, तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीच्या मुद्यावरूनही अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला. आगामी उत्तर प्रदेश (UP) निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका राज्याची निवडणूक जवळ आली म्हणून आपले सरकार किती लाचार होणार आहे? आपली भाषा, संस्कृती आणि राज्य बाजूला ठेवून तुम्ही त्यांच्या भाषेसाठी लढताय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जे लोक प्रामाणिकपणे मराठी शिकत आहेत, त्यांच्याशी आमचा कोणताही विरोध नाही, परंतु जर कोणी मराठी माणसावर अरेरावी करत असेल किंवा दादागिरी चालवत असेल तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

      सत्तेसाठी किती लाचार होणार, असा सवाल करत अमित ठाकरेंनी अत्यंत आक्रमक शब्दांत थेट चेतावनी दिली. “तुम्ही कोणाला चॅलेंज करत आहात? आम्ही मराठीतच बोलणार, आमच्या अंगावर आलात तर कन्फर्म मार खाणार,” असे म्हणत त्यांनी विरोधक आणि सरकारला कडक इशारा दिला. महाराष्ट्राची अस्मिचता आणि मराठी भाषेच्या हक्कासाठी तरुण पिढीने आणि सर्वसामान्यांनी आता एकजूट होण्याची वेळ आली असून, सत्तेच्या बळावर जनतेच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्यांना चपराक दिली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!