मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आवाहन
पुणे: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे राज्यातील एकही मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचिंत राहू नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) अत्यंत महत्त्वाची पावले उचलली आहेत. ज्या अर्जदार किंवा विद्यार्थ्यांनी अद्यापही आपल्या जात वैधता प्रमाण पत्रातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी तात्काळ संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधून सर्व त्रुटी दूर कराव्यात, असे स्पष्ट आणि काटेकोर आवाहन बार्टीच्या महासंचालक तथा राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
सध्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय किंवा आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया जोमाने सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारखा आणि वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज अत्यंत उशिरा सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर करण्याबाबत एसएमएस, ईमेल आणि अधिकृत पत्रांद्वारे वेळोवेळी अवगत करण्यात आले होते. तरीही अनेक अर्जदारांनी संबंधित समितीशी अजूनही संपर्क साधलेला नाही, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांचीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष किंवा त्यांचे भविष्य कागदपत्रां अभावी धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने विद्यार्थीकेंद्री भूमिका घेत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. अर्जदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी सार्वजनिक किंवा साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही आपली कार्यालये सुरू ठेवावीत, असे कडक निर्देश महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जेणेकरून सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना आपल्या त्रुटी दूर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होईल. प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात ऐनवेळी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आपल्या जिल्ह्याच्या पडताळणी समितीशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करावी, असे आवाहन पुन्हा एकदा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.
