चाकणला मोठा दिलासा; पवन मावळात ११०० एकरांवर नवीन एमआयडीसी
पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीवरील वाढता ताण आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील बऊर, करुंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांच्या परिसरात तब्बल ११०० एकर क्षेत्रावर (सुमारे ४०५ हेक्टर) नवीन औद्योगिक क्षेत्र (MIDC) प्रस्तावित करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत जमिनीची मोजणी आणि प्राथमिक सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले असून, दरनिश्चिती व भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात गेल्या काही वर्षांत उद्योगांची प्रचंड वाढ झाल्यामुळे रस्ते, पाणी, वीज आणि एकूणच वाहतूक व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. अवजड वाहनांची वाढती संख्या आणि कामगारांची मोठी वर्दळ यामुळे चाकण मध्ये सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. यावर शाश्वत उपाय म्हणून उद्योगांच्या विस्तारासाठी पर्यायी आणि हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पवन मावळातील या परिसराची निवड करण्यात आली आहे. प्रस्तावित क्षेत्रामध्ये बऊर येथे सुमारे ८७ हेक्टर, करुंज येथे १३५ हेक्टर आणि ब्राह्मणवाडी येथे १८३ हेक्टर जमीन समाविष्ट असून, सलग जमीन उपलब्ध होत असल्याने औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या सद्यस्थिती बाबत माहिती देताना मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी स्पष्ट केले की, तीनही गावांमधील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दरनिश्चितीचा प्रस्ताव राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून दर निश्चित झाल्यानंतर भूसंपादनाची पुढील प्रक्रिया अधिक वेगाने सुरू केली जाईल. प्रशासनाच्या नियोजना नुसार पुढील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत भूसंपादनाचे टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरनिश्चितीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित जमीन धारकांकडून जमीन संपादनाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल.
हे नवीन औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर चाकण परिसरातील अतिरिक्त उद्योगांची वाढ काही प्रमाणात तळेगाव आणि पवन मावळ पट्ट्याकडे वळवली जाऊ शकते. यामुळे चाकण मधील वाहतूक कोंडी आणि विद्यमान पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल. तसेच, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून परिसराच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, या उद्योगांच्या आगमना सोबतच सक्षम रस्ते, सार्वजनिक वाहतूक, वीज, पाणी आणि जलनिस्सारण यांसारख्या पायाभूत सुविधा वेळेत उभाराव्या लागणार असून पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या हिताचा योग्य समतोल राखण्याचे आव्हानही प्रशासना समोर असणार आहे.
