महत्त्वाच्या बातम्या

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याची लूट

    राज्यात अनेक ठिकाणाहुन चोरी, लुटमारी, फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. यातच पुण्यातील एका विद्यार्थ्याला लुटण्याची घटना समोर आली आहे. हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. अलीकडच्या काळात टेकड्यांवर झालेल्या लूटमारीच्या घटना, तसेच बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टेकड्यांच्या परिसरात गस्त घालण्याचा आदेश दिला होता. मात्र, ती कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.

      याबाबत तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायला आहे. रविवारी दुपारी तो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास टेकडीवर दोन चोरट्यांनी त्याला धमकावले; तसेच मारण्याची धमकी देऊन त्याच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली.

     घाबरलेल्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. बाणेर टेकडीवर ईशान्येकडील विद्यार्थ्याला धमकावून त्याला लुटण्यात आले होते. तसेच याच टेकडीवर फिरायला गेलेल्या ईशान्येकडील तरुणीसह बरोबरच्या मैत्रिणींना लुटण्यात आल्याची घटना घडली होती. हनुमान टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणाला लुटण्यात आल्याच्या घटने संदर्भात पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!