महत्त्वाच्या बातम्या

देश-राज्याची अर्थव्यवस्था गंभीर संकटात; शरद पवारांचा गंभीर आरोप

बारामती: देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीच्या काळातून जात असून, दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणे देखील कठीण झाले आहे, असा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. बारामती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सरकारकडून आर्थिक वास्तव लपवण्यासाठी आणि जनतेचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सातत्याने नवीन मुद्दे पुढे आणले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून तिमाही जीडीपी बाबत अर्थव्यवस्थेचे अत्यंत गुलाबी चित्र उभे केले जात असले, तरी प्रत्यक्षातील आर्थिक समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या महागाईच्या झळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी काळात रुपयाच्या मूल्यांत मोठी घट झाल्यास त्याचा थेट आणि अतिरिक्त भार सर्व सामान्यांच्या खिशावर पडेल, ज्यामुळे महागाईचा वणवा आणखी भडकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

        राज्यातील खालावलेल्या शेती आणि हवामानाच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की, सध्या राज्यातील पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक असून, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांना तीव्र दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार करावी लागणारी दुबार पेरणी आणि पिण्याच्या पाण्याचा गंभिर प्रश्न यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला असून, या गंभीर संकटग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे.

      साखरेच्या वाढत्या दराचा अपेक्षेप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा फायदा मिळालेला नाही, त्यामुळे वाढीव दरातील योग्य हिस्सा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी साखर आयातीला तीव्र विरोध दर्शवला. याशिवाय, अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणावर थांबली असून, ग्राहकांना शुद्ध दूध मिळत असल्याने ते त्यासाठी दोन पैसे जास्त मोजण्यासही तयार असल्याचे सांगत त्यांनी या कठोर मोहिमेचे मनापासून समर्थन केले.

        राज्य आणि देशातील इतर महत्त्वाच्या सामाजिक तसेच राजकीय घडामोडींवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना, या प्रकरणी शासनस्तरावर मंत्री नेमका काय निर्णय घेतात, हे आगामी काळात पहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थी आंदोलनाबाबत सरकारच्या धोरणांमधील त्रुटींवर न्यायव्यवस्थेनेही योग्य ते लक्ष वेधले असून, लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळालाच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

       दरम्यान, आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित बारामती दौऱ्या बाबत माहिती देताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख सुचविण्यात आली असून प्रशासकीय सोयीनुसार ही तारीख पुढे-मागे होऊ शकते. बारामतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संस्थेची पाहणी करणे आणि त्याबाबतचे सादरीकरण पाहण्यासाठी हा दौरा नियोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!