महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांच्या निधनावरून राजकारण नको; सुनेत्रा पवारांचा स्पष्ट इशारा

पुणे: अजित पवार यांच्या निधना नंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि भावनिक वातावरणात आता आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय स्पष्ट आणि ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादांच्या दुर्दैवी निधनावर कोणीही राजकारण करू नये आणि वारंवार माध्यमांसमोर येऊन ‘मीडिया ट्रायल’ चालवणे थांबवावे, असे आवाहन करतानाच या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी आमचाही गांभीर्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले आहे.

        काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘माझा भाऊ गेला आणि काही आमदार सत्ता भोगत आहेत,’ अशा शब्दांत तीव्र शब्दांत टीका केली होती. या टीके संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित दादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबावर आणि महाराष्ट्रावर जे दुःखाचे डोंगर कोसळले आहेत, त्याची जाणीव आमच्या इतकी किंवा माझ्या मुलांइतकी इतर कोणालाही असणार नाही, असे सांगत त्यांनी या दुर्दैवी घटनेवर होणाऱ्या राजकारणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असून, आम्हाला काहीच वाटत नाही किंवा आम्ही या प्रकरणी काहीच करत नाही, असा चुकीचा समज कोणीही करून घेऊ नये, असे त्यांनी सुनावले.

           अजित दादांच्या निधना बाबतची सर्व सत्य परिस्थिती आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा सर्वांनाच अधिकार असून त्या दृष्टीने आमचाही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या उच्चस्तरीय चौकशी बाबत बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित तपास यंत्रणांवर आमचा अफाट विश्वास असून, या माध्यमातून संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी दर्शवला. या संवेदनशील आणि वेदनादायी मुद्यावर अनावश्यक राजकारण करणे टाळून कुटुंबाच्या भावनांचा व तपासाचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!