महत्त्वाच्या बातम्या

वाईत १२ मद्यपींवर गुन्हे; सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका

वाई: शहरातील पवित्र कृष्णा नदीचे घाट, मंदिरे, पसरणी घाट आणि स्मशानभूमी सारख्या सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना व भाविकांना त्रास देणाऱ्या मद्यपीं विरोधात वाई पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यां विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी १२ जणांना रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

        गेल्या काही दिवसांपासून वाई शहरातील मंदिरांच्या परिसरामागे मद्यपान करून दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडणे, पसरणी घातातील कट्ट्यांवर बसून मद्यपान करून त्याच ठिकाणी कचरा टाकणे, तसेच कृष्णा नदीच्या तीरावरील पवित्र घाट आणि स्मशानभूमी परिसरात मद्यपान करून अंगलट येणे आणि शिवीगाळ व गोंधळ घालण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. या प्रकारांमुळे नागरिक, भाविक आणि महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम आखण्यात आली.

         ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वाई पोलीस ठाण्याची चार विशेष पथके एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, विविध स्मशानभूमी परिसर तसेच शहरातील अन्य संशयित व संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी धडक देत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या १२ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्वांना तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

          या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ८५(१) आणि ७५(क) अन्वये एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रभावी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्डच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. धार्मिक व पवित्र स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वाई पोलिसांची ही मोहीम यापुढेही अशीच कडक पद्धतीने सुरू राहणार असल्याचा संदेश या कारवाईमुळे दिला गेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!