महत्त्वाच्या बातम्या

स्नॅपचॅटवर मैत्री, दीड लाखांची फसवणूक; तरुणाला अटक

पुणे: स्नॅपचॅटवर बनावट तरुणीची खोटी ओळख निर्माण करून एका तरुणाची क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली तब्बल दीड लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा अत्यंत शक्कल लढवून घडलेला प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाने बनावट अकाउंट चालवणारी व्यक्ती प्रत्यक्षात कोणतीही तरुणी नसून, पर्वती परिसरातील एक उच्चशिक्षित तरुण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा अत्यंत चलाखीने मुलीच्या आवाजात संबंधित तरुणाशी नियमित संभाषण करायचा आणि विश्वासात घेऊन क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचा.

        याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर, पुणे) असे नाव असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी कुणाल याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून, त्याने सोशल मीडियावर ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाने खोटे प्रोफाईल तयार केले होते. तक्रार दाराच्या स्नॅपचॅट खात्यावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्यात मैत्री निर्माण करण्यात आली. त्यानंतर तब्बल सहा ते सात महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरून नियमित संवाद साधत आरोपीने फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला. मैत्रीचा हाच गैरफायदा घेऊन, क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा आणि आकर्षक परतावा मिळतो, असे थापा मारत त्याने तक्रार दारास गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. यावर पूर्णपणे विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वेळोवेळी आपल्या क्रिप्टो वॉलेट मधून आरोपीच्या वॉलेटमध्ये १४६८ युएसडीटी (अंदाजे दीड लाख रुपये) इतकी रक्कम ट्रान्सफर केली.

       काही कालावधी नंतर तक्रार दाराने गुंतवणुकीत झालेली वाढ, परतावा आणि मूळ पैशां संदर्भात विचारणा करण्यास सुरुवात केली, तेव्हा ‘प्रिन्सिका जोशी’ बनून वावरणारा आरोपी अचानक फरार झाला आणि त्याने आपले स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करून संपर्क टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने त्वरित सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्याने सायबर पोलिसांच्या पथकाने उपलब्ध डिजिटल पुरावे, स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक आणि तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण केले. या तांत्रिक तपासात कुणाल अदमाने हाच या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची कोणतीही तरुणी प्रत्यक्षात नसून, कुणाल हा स्वतःच मुलीचा आवाज काढून फिर्यादीशी गोड बोलून संभाषण करत असल्याचे उघड झाले.

         पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक शरद शेळके यांच्या सूचनांनुसार सायबर पथकातील अंमलदारांनी ही धडक कारवाई केली. आरोपी कुणाल अदमाने याने अशाच प्रकारे सोशल मीडियावर मुलीची बनावट ओळख निर्माण करून इतर किती जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे आणि कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याबाबतचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!