महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची; पुण्यात सत्कार सोहळा

पुणे: शिक्षण हे मानवी जीवनातील सर्वात प्रभावी शस्त्र असून शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्राची खरी संपत्ती आणि समाज शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि उच्च वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे भूमीत शिक्षणाचा वारसा अत्यंत समृद्ध असून, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्याचे नाव उंचावले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

          सध्याच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी केवळ पारंपारिक अध्यापनावर न थांबता अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे सांगत पालक मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, मूल्याधारित आणि समस्या निवारणाचे धडे देण्याचे आवाहन केले. स्व. अजित दादांनी नेहमीच पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते, याची आठवण करून देत त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत डिजिटल वर्गखोल्या, ई-लर्निंग सुविधा आणि आधुनिक संगणक कक्ष उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना ‘निपुण महाराष्ट्र अभियान‘, ‘मुख्यमंत्री विज्ञानवारी‘ आणि सायन्स सेंटर यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक व वैज्ञानिक विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या उच्चस्तरीय कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी, शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे जिल्ह्यात ४३६ नवीन शिक्षक लवकरात लवकर रुजू होणार असून यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळांना संरक्षक भिंती बांधण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

         मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडताना, राज्य गुणवत्ता यादीतील तब्बल ५० टक्के विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे असल्याचे सांगितले. तसेच मिशन ३००, ग्लोबल गुरुजी, बालकुमार साहित्य संमेलन आणि मुलींसाठी सायकल बँक यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. या भव्य सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५३ आदर्श शिक्षकांचा, ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!