महत्त्वाच्या बातम्या

खाकी वर्दीला काळिमा, तरुणीचा विनयभंग करणारा हवालदार अटकेत

पुणे: शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि पोलीस दलाची मान खाली झुकवणारी घटना समोर आली आहे. विनापरवाना आपल्या कर्तव्यातून दीर्घकाळ गैरहजर राहून, दारूच्या प्रचंड नशेत एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी एका पोलीस हवालदाराला बेड्या ठोकल्या आहेत. बबन अशोक वाघ (Baban Ashok Wagh) असे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निलंबित पोलीस हवालदाराचे नाव असून, तो सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता. या अत्यंत गंभीर आणि निंदनीय कृत्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी आरोपी बबन वाघ याला तडकाफडकी सेवेतून निलंबित केले आहे.

       मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी पोलीस हवालदार बबन वाघ हा गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच १७ जुलै २०२६ पासून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आपल्या कर्तव्यावरून विनापरवाना गैरहजर राहत होता. ड्युटीवर अनुपस्थित राहून बेजबाबदारपणे वागत असतानाच, ४ सप्टेंबर रोजी त्याने हद्द पार करत दारूच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे अत्यंत असभ्य व लज्जास्पद कृत्य केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पीडित तरुणीने तातडीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी सविस्तर फिर्याद नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत बबन वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

       चतुःशृंगी पोलिसांनी या कारवाईची माहिती आणि सविस्तर अहवाल आरोपीच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी म्हणजेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे पाठवला. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या संपूर्ण गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती तातडीने पोलीस उपायुक्त कार्यालयाला सुपूर्द केली. पोलीस दलासारख्या शिस्तप्रिय आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेत कार्यरत असताना खाकी वर्दीला काळीमा फासणारे वर्तन केल्यामुळे आणि यामुळे संपूर्ण पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाल्यामुळे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी कठोर पावले उचलली. प्रशासकीय शिस्त व जनमानसातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी बबन वाघ याला निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!