महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात तरुणावर जीवघेणा गोळीबार; कोंढव्यात टोळक्यावर गुन्हा दाखल

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगर भागात पूर्व वैमनस्यातून एका मद्यपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याने उच्छाद मांडत तरुणावर थेट पिस्तुलातून गोळीबार केल्याची अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, कोंढवा पोलीस ठाण्यात मुख्य आरोपींसह १० ते १२ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सौरभ अनिल त्रिंबके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर म्हणून काम करतो. पोलिसां कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभ हा कोंढव्यातील लक्ष्मी नगरमधील गल्ली क्रमांक ६ येथे एका गणेशोत्सव मंडपाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणा जवळ आपल्या बंटी पवार या मित्राशी गप्पा मारत उभा होता. या दरम्यान, त्याचा पूर्वीचा मित्र सागर पंधरकर याच्याशी झालेल्या वादाच्या जुन्या कारणा वरून चिक्क्या ऊर्फ आरोह सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा आणि त्यांच्या सोबत असलेले इतर ८ ते १० जण त्या ठिकाणी अचानक धडकले.

        आरोपींनी परिसरात विनाकारण आरडा ओरडा करत आणि हातात हत्यारे लहरावत मोठी दहशत निर्माण केली, ज्यामुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिक भयभीत होऊन सैरावरा पळून गेले. या गोंधळाचा फायदा घेत मुख्य आरोपी दादू भालेराव याने आपल्या जवळील अवैध पिस्तूल काढून थेट सौरभ त्रिंबके याच्या दिशेने जिवघेणा गोळीबार केला. ही गोळी सौरभच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार निघून गेली, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून गंभीर जखमी झाला.

       हल्ला केल्यानंतर आरोपींचे टोळके परिसरात दहशत पसरवत घटना स्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि मित्रांनी जखमी सौरभला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पीडित सौरभ त्रिंबके याने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी दादू भालेराव, चिक्क्या उर्फ आरोह सनी पिल्ले, जाम्बा आणि इतर १० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या गोळीबाराच्या सत्रामुळे कोंढवा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पसार झालेल्या संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!