महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भव्य तंत्रज्ञान प्रदर्शन; ३ हजारांहून अधिक विद्यार्थी-अभियंते एकत्र येणार

पुणे: आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन २०२६ निमित्त दोन दिवसीय भव्य तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वती येथील प्रसिद्ध अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (APCOER) येथे १० आणि ११ सप्टेंबर रोजी हा उच्चस्तरीय सोहळा पार पडणार आहे. पुणे आरएमसी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि APCOER यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून, यात राज्यभरातून ३,००० हून अधिक विद्यार्थी-अभियंते, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि नामांकित सल्लागार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

       या दोन दिवसीय महोत्सवामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध तांत्रिक स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तांत्रिक स्पर्धा, अभिनव प्रकल्प व स्टार्ट-अप सादरीकरण, संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरण, तसेच काँक्रीट क्यूब आणि पर्यावरणपूरक ‘ग्रीन काँक्रीट मिक्स डिझाईन’ स्पर्धेसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील अंतर कमी करून युवा अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

       या भव्य प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बांधकाम आणि यंत्रसामग्री क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये XCMG, THERMAX, JSW, Ammann, Putzmeister, REPOS आणि Sprint यांसारख्या देश-विदेशातील नामांकित कंपन्या स्वतःच्या स्टॉलच्या माध्यमातून अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि मशिन्सचे सादरीकरण करणार आहेत. बुधवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता शाहू कॉलेज कॅम्पस, पर्वती येथील APCOER प्रांगणात या सोहळ्याचे अधिकृत उद्घाटन होणार असून, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!