महत्त्वाच्या बातम्या

दहीहंडीतील अश्लील नृत्य भोवले; पुण्यात नृत्यांगना आणि आयोजकांवर गुन्हे दाखल

पुणे: राज्यात विविध सार्वजनिक सण-उत्सावांच्या नावाखाली संस्कृतीच्या मर्यादा ओलांडून अश्लील व आक्षेपार्ह प्रकार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमांमध्ये अश्लील गाण्यांवर धिंगाणा घाजत घृणास्पद हावभाव आणि नियमबाह्य नृत्यप्रकार सादर केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह तब्बल आठ डान्सर्सवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ कलाकारांवरच कारवाई न करता अशा अश्लील कार्यक्रमांना आपल्या मंचावर परवानगी देणाऱ्या संबंधित दहीहंडी मंडळांच्या अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

      दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या धामधुमीत पुण्यासह मुंबई व लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, या कार्यक्रमांच्या नावाखाली अनेकदा कर्णकर्कश व अश्लील गाण्यांवर आक्षेपार्ह नृत्य सादर केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या, ज्यावरून मोठा वाद पेटला होता. यापूर्वी पुण्यातच एका दहीहंडी कार्यक्रमातील नृत्यप्रकारावरून प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई केली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक उत्सवांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आता सहकारनगर पोलिसांनी आणखी कठोर पावले उचलत निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह अन्य आठ नृत्यांगनां विरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

     पोलिसांनी या प्रकरणात केवळ डान्सर्सनाच नव्हे, तर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना आणि मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही रडारवर घेतले आहे. संबंधित कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेतली होती का, परवानगी देताना घातलेल्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन झाले का, तसेच मंचावर सादर होणाऱ्या अश्लील गाण्यांना व आक्षेपार्ह नृत्यप्रकारांना आयोजकांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संमती होती का, या सर्व बाबींचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. सार्वजनिक सुरक्षिततेचे नियम मोडणे, विनापरवाना कार्यक्रम घेणे किंवा परवानगीच्या अटींचा भंग करून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल असे कृत्य करणे, या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलीस कसून चौकशी करत आहेत. या धडक कारवाईमुळे सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या आयोजकांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!