महत्त्वाच्या बातम्या

कोंढव्यात नशाविरोधी लढ्याला बळ; हाजी गफुर पठाण यांच्या नेतृत्वात भव्य रॅली

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसर पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी आणि वाढत्या व्यसनवाढी विरोधात कडक भूमिका घेत नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफुर पठाण यांच्या वतीने एका भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोंढवा भागातील वाढती तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकत चालली असताना, कोंढवा पोलीस स्टेशनने नशेचे साहित्य आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यां विरुद्ध अत्यंत कडक कारवाईची मोहीम उघडली आहे. पोलिसांच्या या धाडसी व कायदेशीर कारवाईचे जाहीर समर्थन करण्यासाठी आणि समाजहिताच्या या लढ्यात पोलीस प्रशासना पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

        कोंढवा प्रभाग क्रमांक १९ मध्ये काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीमध्ये परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, स्थानिक मानकरी, मौलाना, उलेमा आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. हातात जनजागृतीचे फलक घेत आणि नशामुक्तीचा नारा देत हजारो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि त्यांच्या पथकाने अवैध धंदे व नशेच्या विरोधात जी धडक कारवाई सुरू केली आहे, तिचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारच्या प्रत्येक कारवाईसाठी सर्व कोंढवा वासी पोलीस प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा स्पष्ट संदेश नगरसेवक अ‍ॅड. गफुर पठाण यांनी यावेळी दिला.

       युवा पिढीला विनाशाच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी आणि कोंढवा परिसर गुन्हेगारी व नशामुक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जनता एकत्र आल्याचे चित्र या रॅलीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई आणि नागरिकांची जनजागृती यामुळे परिसरातील समाज कंटकांचे धाबे दणाणले असून, या प्रेरणादायी उपक्रमामुळे कोंढव्यात नशा मुक्तीच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!