महत्त्वाच्या बातम्या

विद्यानंद बापटांच्या अडचणी वाढल्या; माफी न मागल्यास फौजदारी कारवाई

पुणे: पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे साऊंड सिस्टीम विरोधात आक्रमक भूमिका घेत मोठा लढा उभारणारे विद्यानंद बापट यांना एका कायदेशीर नोटीसमुळे मोठा धक्का बसला आहे. डीजे बंदीच्या मुद्द्यावरून राज्यभरात चर्चेत आलेले बापट गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमां मधून आपली मते मांडत आहेत. या दरम्यान एका मुलाखतीत त्यांना झालेल्या मारहाणीचा प्रकारही गाजला होता. मात्र, आता डीजेच्या विरोधातून पुढे आलेल्या या प्रकरणात त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, ४८ तासांच्या आत हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.

       पुण्यातील गणेशोत्सवात डीजेवर पूर्णपणे बंदी घालून केवळ पारंपरिक वाद्यांच्या गजरात सण साजरे केले जावेत, अशी भूमिका घेत विद्यानंद बापट यांनी रान उठवले आहे. त्यांची ही मोहीम आणि विविध वाहनांना दिलेल्या मुलाखती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र, या प्रचार मोहिमे दरम्यान त्यांनी गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि आराध्य दैवत भगवान श्री गणेश यांच्या विषयी कथित स्वरूपात आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्ये केल्याचा गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बापट यांनी ती मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत आपले लेखी स्पष्टीकरण देऊन समस्त हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. तसेच, निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा किंवा माफी न मागितल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्ह्यासह अन्य कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

      ध्वनी प्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर, नियमांतर्गत आणि सभ्य पद्धतीने आपले मत मांडण्याच्या अधिकाराला आमचा किंवा कायद्याचा कोणताही विरोध नाही, असे ॲड. प्रदीप नाईक यांनी आपल्या नोटीसीत स्पष्ट केले आहे. परंतु, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा परवाना नव्हे, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर समाजातील इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी किंवा श्रद्धांवर आघात करण्यासाठी होऊ नये, असेही या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. डीजे विरोधी आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या विद्यानंद बापट यांच्यासमोर आता या नवीन कायदेशीर संकटामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!