महत्त्वाच्या बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी मोठी संधी; पुण्यातील ४,४६२ सदनिकांच्या अर्जाला महिनाभराची मुदतवाढ

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे काढण्यात आलेल्या ४ हजार ४६२ सदनिकांच्या बहुप्रतिक्षित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या हजारो इच्छुकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध आवश्यक कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणी प्रक्रियेत येत असलेला तांत्रिक विलंब लक्षात घेऊन म्हाडा प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत तब्बल एक महिन्याने वाढवली असून, आता इच्छुक नागरिकांना १५ ऑक्टोबरच्या मध्य रात्रीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध संवर्गातील सदनिकांच्या वितरणासाठी गत २४ ऑगस्ट रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सुरुवातीच्या ठरलेल्या वेळापत्रका नुसार या प्रक्रियेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत निर्धारित करण्यात आली होती. मात्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास (डॉमिसिल) प्रमाणपत्र तसेच प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) यांची ऑनलाइन पडताळणी होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने अनेक कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. ही अडचण दूर करत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी म्हाडाने मुदतवाढ देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

     या मुदतवाढीमुळे मूळ वेळापत्रका नुसार येत्या १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली संगणकीय सोडत आणि इतर टप्प्यांवर परिणाम होणार आहे. अर्जाची अंतिम मुदतच १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे, आता अनामत रक्कम भरण्याची मुदत, पात्र अर्जदारांची प्रारूप आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे दिनांक तसेच प्रत्यक्ष संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक म्हाडाच्या वतीने लवकरच नव्याने जाहीर केले जाईल, अशी सविस्तर माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे. या अतिरिक्त कालावधीमुळे आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ करणाऱ्या आणि तांत्रिक कारणांमुळे अर्ज करू शकलेल्या नसलेल्या हजारो पात्र अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!