महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात आमदाराच्या नावाचा गैरवापर; बनावट लोगो-स्टिकरच्या कारवर पोलिसांची कारवाई

पुणे: राज्यात व्हीआयपी व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून बनावट लोगो आणि स्टिकर्स लावून फिरण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात असाच एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून, कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्याचा कथित बनावट लोगो आणि ‘आमदार’ असे लिहिलेले स्टिकर लावून हुलकावणी देणाऱ्या दोघांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात कठोर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि वाकड परिसरातील वाहनचालक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

         मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी सुधीर कैलास साबळे (वय ३७) हे १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या शासकीय वाहनातून वाकड परिसरातील पार्क स्ट्रीट सोसायटी जवळून जात होते. यादरम्यान त्यांना काळ्या रंगाची एक संशयास्पद कार (MH 14 KQ 0125) अत्यंत संशयास्पदरीत्या जाताना निदर्शनास आली. कारवर लावण्यात आलेले विशिष्ट चिन्ह पाहून पोलिसांना शंका आली, त्यांनी तात्काळ संबंधित गाडीचा पाठलाग करून ती रोखली आणि चालकाची चौकशी सुरू केली.

       पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव बापू मच्छिंद्र ढेरे (वय ३५, रा. आंबेगाव) असल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या सखोल पडताळणी मध्ये ही काळ्या रंगाची कार रोहन जगन्नाथ काटे (रा. पिंपळे सौदागर) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. या कारच्या काचेवर पांढऱ्या व हिरव्या रंगाचा एक गोल लोगो लावण्यात आला होता, ज्यावर हुबेहूब ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’, भारताचे राष्ट्रीय प्रतीक ‘अशोकस्तंभ’ आणि ‘आमदार’ असा अतिशय दिशाभूल करणारा मजकूर छापलेला होता. हा लोगो किंवा स्टिकर वापरण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा कागदपत्रे आहेत का, याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता चालक व मालकाला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही.

        सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी किंवा प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी शासकीय प्रतिकांचा असा बेकायदेशीर वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाकड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कायदेशीर पावले उचलली. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बनावट स्टिकर प्रकरणामागे नेमका कोण आहे आणि अशा प्रकारे किती जणांच्या गाड्यांवर बेकायदेशीर लोगो वापरले जात आहेत, याबाबतचा सखोल तपास वाकड पोलिसांकडून सध्या केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!