महत्त्वाच्या बातम्या

जीएसटी बिलावरून पुण्यात रक्तरंजित थरार; तरुणाचा चुलत्यावर लोखंडी कात्रीने हल्ला

पुणे: कंपनी सुरू करून फरशी बसवण्याच्या आणि वॉटरप्रूफिंगच्या जुन्या कामाच्या जीएसटी बिलावरून झालेल्या वादातून रक्ताचे नाते कलंकित झाल्याची थरारक घटना पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात घडली आहे. पूर्वी एकत्र सुरू केलेल्या व्यवसायातील जीएसटीचे दीड लाख रुपये कोणी भरायचे, यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्याच नातेवाईकावर थेट लोखंडी कात्रीने छातीत जीवघेणा वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे.

        याप्रकरणी राजेंद्र दशरथ जाधव (वय ५०, रा. मळाई पार्क, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल रामदास जाधव (वय २५, रा. मळाई पार्क, फुरसुंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार मळाई पार्क परिसरातील श्री साई विश्व शाळेसमोर १४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र जाधव हे मूळचे फरशी बसविण्याचे काम करतात, तर त्यांचा मुलगा सुरज हा वॉटरप्रूफिंगचे काम करतो. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे साडू रामदास जाधव, मेहुणी आशा जाधव आणि त्यांचा मुलगा विशाल जाधव हे त्यांच्याचजवळ राहण्यास आले होते.

       काही काळापूर्वी सुरज आणि विशाल यांनी एकत्र येऊन वॉटरप्रूफिंगच्या कामासाठी ‘श्री स्वामी समर्थ वॉटरप्रूफिंग’ या नावाने एक एजन्सी सुरू केली होती. ही एजन्सी नोंदणी करण्यासाठी दोघांनी मिळून ४५ हजार रुपयांचा खर्च केला होता आणि वर्षभर त्यांनी एकत्र कामही केले. परंतु, यादरम्यान विशाल हा काही कामे स्वतः करून त्यातून मिळणारा सर्व फायदा स्वतःकडेच घेत असल्याचे निदर्शनास आले. यावरून सुरज आणि विशाल यांच्यात वाद निर्माण झाले आणि दोघांनी आपले व्यावसायिक संबंध संपवून वेगवेगळे काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मागील काळात केलेल्या कामाचे तब्बल दीड लाख रुपये जीएसटीचे भरणे बाकी होते आणि हाच मुळ वादाचा मुद्दा ठरला.

        मागील कामाचा जीएसटी भरण्यावरून विशालने सुरजकडे तगादा लावला होता. त्यावर सुरजने स्पष्ट भूमिका मांडली होती की, विशालने सर्व एजन्सी स्वतःच्या नावावर करून तिचा संपूर्ण फायदा स्वतः घेतला आहे, मग आता जीएसटी आम्ही का भरायचा? याच मुद्द्यावरून त्यांच्यात यापूर्वीही वाद झाले होते. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी विशाल जाधव, बबन जाधव, आशा जाधव आणि रामदास जाधव हे सर्वजण मिळून फिर्यादी राजेंद्र जाधव यांच्या घरी आले आणि जीएसटीच्या पैशांवर पुन्हा एकदा जोरदार वाद घालू लागले. घरात वाद वाढू नये म्हणून फिर्यादींनी सर्वांना घराबाहेर चलण्यास सांगितले.

        सर्वजण श्री साई विश्व शाळेसमोर रस्त्यावर आले असता, तिथे विशाल जाधव याने फिर्यादी राजेंद्र जाधव आणि त्यांचा मुलगा सुरज यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीला त्यांनी प्रतिकार केला असता, संतापलेल्या विशालने त्याच्या जवळील लोखंडी कात्री काढून ती राजेंद्र जाधव यांच्या बगलेत व छातीत खुपसली. या भीषण हल्ल्यात ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. हे कृत्य केल्यानंतर आरोपी विशाल घटनास्थळावरून पळून गेला. कुटुंबीयांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र जाधव यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची जखम अतिशय गंभीर असल्याचे सांगून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंदारे करीत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!