महत्त्वाच्या बातम्या

विहिरीतील मोटार चोरीचा छडा; म्हसवड पोलिसांकडून तिघांना अटक, तीन मोटारी जप्त

सातारा : म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विहिरीतून पाणबुडी मोटार चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या असून, तपासात आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

       कुकुडवाड (ता. माण) येथील रविंद्र जालिंदर कुंभार यांच्या चहूर नायाच्या शिवारातील सार्वजनिक विहिरीतून स्मार्ट कंपनीची पाणबुडी मोटार चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

       गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी अरिफुल विलास जाधव (रा. मानवाडी, कुकुडवाड, ता. माण), आदित्य तानाजी पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) आणि वैभव विकास फाळके (रा. पुनर्वसन कॉलनी, मायणी, ता. खटाव) यांना ताब्यात घेतले.

       आरोपींची चौकशी केली असता त्यांनी मोटार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली पाणबुडी मोटार तसेच चोरी केलेल्या अन्य दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

      ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमन, सहायक पोलीस निरीक्षक अमित शिंदे तसेच पोलीस अंमलदारांनी केली. पुढील तपास म्हसवड पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!