महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा दुष्काळमुक्त करणार; १०० टीएमसी पाणी आणणार – फडणवीस

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या पाण्यासाठी आणि शेतकरी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची व दूरगामी घोषणा केली आहे. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला कधीही दुष्काळ पाहू द्यायचा नाही, असा ठाम संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोऱ्यातून ३० टीएमसी आणि कोकणातील उल्हास खोऱ्यातून ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यात व गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची रूपरेषा स्पष्ट केली. टप्प्याटप्प्याने पुढील सात वर्षांत हे काम पूर्ण करून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त केला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढ्या पासून चालत आलेला संघर्ष आणि यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे शेतकर्‍यांसमोर निर्माण झालेल्या संकटाचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पांची माहिती दिली. कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यामार्फत अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, याद्वारे धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांपर्यंत पाण्याचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच कोकणातील उल्हास खोऱ्यातून वाहून जाणारे सुमारे ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हे सर्व प्रकल्प पुढील सात वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जातील, ज्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होईल.

    यंदा पावसाने खंड दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शासन पूर्णपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले. येत्या ५ ऑक्टोबरनंतर पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून सर्व बाधित शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल तसेच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सर्वसमावेशक निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. याशिवाय शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयासोबतच सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीज बिले माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

       मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण, मानवंदना आणि शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक लढा आणि स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सतिष चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार सुहास शिरसाट, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार विलास भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह अनेक मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!