महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांची पार्किंग व्यवस्था जाहीर

पुणे : गणेशोत्सवातील मुख्य विसर्जन मिरवणूक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता निघणार आहे. मिरवणूक आणि गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुणे शहरात मोठ्या संख्येने भाविक व नागरिक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने विविध भागांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे.

          पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांना प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर किंवा ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन सेवा आणि नागरिकांची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुचाकी आणि चारचाकीसाठी पार्किंग

दुचाकी व चारचाकी दोन्ही वाहनांसाठी शिवाजी आखाडा वाहनतळ, हमालवाडा (पत्र्यामारुती चौकाजवळ), आरटीओ चौकाजवळील एआयएसएसएमएस मैदान, एस.पी. कॉलेज परिसर, निलायम टॉकीज परिसर, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज परिसर, बीएमसीसी रोडवरील जैन हॉस्टेल मैदान, रानडे पथ, टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल तसेच भिडे पूल ते गाडगीळ पूल दरम्यानचे नदीपात्र या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था

         केवळ दुचाकी वाहनांसाठी न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग), गोगटे प्रशाला, सारसबागसमोरील पेशवे पार्क, सावरकर चौकातील हरजीवन हॉस्पिटलसमोरील जागा, पाटीज प्लाझा पार्किंग परिसर येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पार्वती ते दांडेकर पूल, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, मराठवाडा कॉलेज परिसर, पेशवे पथ आणि काँग्रेस हाऊस रोड या भागांतही दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

चारचाकी वाहनांसाठी विशेष जागा

      चारचाकी वाहनांसाठी पुरम चौकाजवळील पीएमपीएल मैदान आरक्षित करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात पोलिसांच्या वाहनांसाठी देसाई कॉलेज परिसर राखीव ठेवण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी गर्दी होणार असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंगस्थळांचाच वापर करावा. रस्त्यावर बेशिस्तपणे किंवा प्रतिबंधित ठिकाणी वाहने उभी न करता वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!