वाघोलीत एटीएम चोरीचा प्रयत्न फसला; टेंपोसह आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात
पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पीएमपीएल चार्जिंग स्टेशनजवळ असलेले ‘इंडिया एटीएम’ मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला टाटा एसीई सीएनजी टेंपो आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश अशोक पवार (वय ३२, रा. एस.टी. कॉलनी, वाघोली, मूळ रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे दोन ते साडेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाघोलीतील इंडिया एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. टेंपोच्या सहाय्याने एटीएम मशिन हलवून खाली पाडण्यात आले. मात्र, मशिन वजनाने जड असल्याने ते घेऊन जाण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे एटीएम मशिन घटनास्थळीच सोडून चोरटे टेंपो आणि मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच खबर्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी वाघोलीतील एस.टी. कॉलनी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने एस.टी. कॉलनी येथे जाऊन गणेश पवार याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने दोन साथीदारांच्या मदतीने एटीएम चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून ५ लाख रुपये किमतीचा टाटा एसीई सीएनजी टेंपो आणि ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवान (ADS-2), पोलीस निरीक्षक वाहीद पठाण (युनिट-७) तसेच पोलीस अंमलदार सारंग ढोळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, सुहास तांबेकर आणि प्रफुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
