महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवात भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; दोन अल्पवयीनांकडून गावठी कट्टा जप्त

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात विशेष गस्त आणि तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला.

       १८ सप्टेंबर २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे आणि पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व सोहम शेंडकर हे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना लेकटाऊन रोडवरील शंकरराव राजाराम कदम जलतरण तलावासमोरील बाजूस दोन अल्पवयीन मुले संशयास्पदरीत्या थांबली असल्याची माहिती मिळाली.

       माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत दोन्ही बालकांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा आढळून आला. पोलिसांनी हा कट्टा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४७५/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजून ५३ मिनिटांनी ही कारवाई केली.

       ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!