महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन, एपीके फाईल पाठवून ३ लाखांचा गंडा

पुणे: शहरात सायबर गुन्हेगारांचे नवनवीन आणि क्लृप्त्या लढवून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यातच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नावाने दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून एका नागरिकाची तब्बल तीन लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या डिजिटल फसवणुकीच्या प्रकारामुळे पुणे शहर आणि परिसरातील वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्या विरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, या प्रकरणातील फसवणूक झालेले नागरिक हे पुण्यातील मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठ परिसरात राहतात. सायबर भामट्यांनी अत्यंत चलाखीने एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांच्यावर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई झाल्याचे भासवले. या कारवाईची खात्री करण्यासाठी किंवा चलन भरण्यासाठी चक्क एका ‘APK’ फाईलच्या स्वरूपात बनावट चलन पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे, फिर्यादीचा हाच मोबाईल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी थेट लिंक केलेला होता. सायबर चोरांच्या या जाळ्यात अडकत फिर्यादीने ती संशयित एपीके फाईल आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून उघडली, त्यानंतर अवघ्या काही क्षणातच चोरट्यांनी मालवेअर किंवा तांत्रिक कौशल्याचा वापर करून त्यांच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा (Remote Access) मिळविला.

           मोबाईलचा ताबा मिळताच सायबर चोरट्यांनी अतिशय वेगाने हात चालवत फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने इतर अज्ञात खात्यांवर वळवून घेतले. बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुळे या प्रकरणाचा अत्यंत कसून आणि तांत्रिक तपास करत आहेत. कोणत्याही अज्ञात क्रमांका वरून येणाऱ्या एपीके फाईल्स किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करण्याचे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांच्या वतीने नागरिकांना केले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

error: Content is protected !!