गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण
पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्याच्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यात भक्ती आणि उत्साहाच्या महापुरा सोबतच सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृतींनी पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या मंडई ते अलका चौक या मिरवणूक मार्गावर यंदा एक अत्यंत कल्पक आणि नेत्रदीपक देखावा साकारण्यात आला आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून बाप्पाच्या निरोपाच्या या ऐतिहासिक सोहळ्यात अन्नभेसळी सारख्या गंभीर सामाजिक समस्ये विरोधात जनजागृती करणारी भव्य रांगोळी तयार करण्यात आली असून, या कलाकृतीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरा समोर सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कलाकृती सादर करण्याची परंपरा राष्ट्रीय कला अकादमीने कायम राखली आहे. यंदाच्या वर्षीच्या या भव्य रांगोळीसाठी अन्नभेसळीची समस्या केंद्रस्थानी ठेवण्यात आली असून, रस्त्यावर ‘अन्नभेसळीच्या राक्षसाची’ हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विविध दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ आणि त्याचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रांगोळीच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हा अन्नभेसळीचा राक्षस थेट गणपती बाप्पाच्या पायाखाली तुडवला जात असल्याची अत्यंत बोलकी आणि कलात्मक संकल्पना या संपूर्ण रांगोळीतून मांडण्यात आली आहे.
या भव्य आणि विलोभनीय रांगोळीच्या निर्मितीमागे शेकडो विद्यार्थ्यांची अथांग मेहनत आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असून, गेल्या तीन महिन्या पासून त्यांनी या कलाकृतीचा सराव आणि तयारी केली होती. विद्यार्थ्यांच्या या अफाट कल्पकतेला आणि कष्टाला जेव्हा प्रत्यक्षात रूप मिळाले, तेव्हा मंडई ते अलका चौक हा संपूर्ण मार्ग जणू एका कलाविष्काराची पायघडी घालून सजल्याचे भासत होते. विसर्जन मिरवणुकी साठी अथांग जनसागरा सारखे रस्त्यावर उतरलेले गणेशभक्त आणि भाविक या भव्य रांगोळीचे दर्शन घेण्यासाठी विशेष गर्दी करत आहेत. कलेच्या माध्यमातून एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावर बोट ठेवत नागरिकांना सचेत करण्याचे काम या उपक्रमाने साधले आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे, यंदाची ही सामाजिक संदेश देणारी भव्य रांगोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना समर्पित करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. त्यामुळे या कलाकृतीच्या सामाजिक आणि कलात्मक संदेशा सोबतच राजकीय व सार्वजनिक वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. पारंपारिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या जयघोषात चाललेल्या या महा सोहळ्यात पुण्यातील तरुणांनी साकारलेली ही रांगोळी उत्सवकाळात एका नवीन विचाराची पेरणी करणारी ठरली असून, पुणेकरा कडून या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे भरभरून कौतुक केले जात आहे.
