महत्त्वाच्या बातम्या

वाघोलीत भरधाव टेम्पोचा कहर; ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

पुणे: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहनांच्या वाढत्या वेगामुळे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, वाघोली परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वाघोली परिसरातील कावडे वस्तीजवळ भरधाव टेम्पोने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवर सहप्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात मृत महिलेचा १८ वर्षीय तरुण मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाघोली आणि आसपासच्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

         मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, गीता रवींद्र चव्हाण (वय ३८, रा. कोलते पार्क, कावडे वस्ती, वाघोली) असे मृत पावलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसा पासून पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ आणि चालकांच्या बेपर्वा ड्राइविंगमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. मृत गीता चव्हाण आणि त्यांचा १८ वर्षीय मुलगा समर्थ हे दोघे २३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून नियमित कामासाठी अहिल्यानगर रस्त्याने जात होते. वाघोली परिसरामध्ये त्यांची दुचाकी आली असताना, मागून अत्यंत वेगात आलेल्या एका अनियंत्रित टेम्पोने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

        या अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गीता चव्हाण रस्त्यावर जोरात आदळल्या आणि गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचा मुलगा समर्थ हा देखील दुचाकीवरून दूर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावले आणि जखमी मायलेकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच गीता चव्हाण यांनी प्राण सोडले होते, ज्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. जखमी तरुण समर्थ याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

        याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अपघात घडवून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या टेम्पो चालकाला शिताफीने ताब्यात घेतले. मृत महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून संबंधित टेम्पो चालका विरुद्ध कायदेशीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश गळगटे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि वाहतूक पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी तसेच जड वाहनांच्या वेगावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी संतप्त मागणी आता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

 

 

error: Content is protected !!