साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट 1 ठार तर 2 गंभीर जखमी
सातारा- माची पेठेतील आदालत वाड्याजवळील सर्व्हिसिंग सेंटर च्या शेजारी असलेल्या दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट आज दुपारी 1.30 च्या सुमारास घटना घडली . या घटने मध्ये 1 ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी बॉंब स्कॉड व श्वान पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे .
स्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मुनीर पालकर ( वय 35 रा. गुरुवार पेठ परज, सातारा) तर गंभीर जखमींची नावे उमर बागवान व हारून बागवान ( सातारा) अशी आहेत. या दोघांवर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुनीर पालकर , हारून व उमर बागवान हे दुपारच्या वेळेस दुकानात बसले होते त्यावेळी अचानक शॉर्टसर्किट होऊन या दुकानातील कॉम्प्रेसरचा अत्यंत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की मुनीर पालकर हे तब्बल 30 फुट उंच हवेत उडून डांबरी रस्त्यावर पडले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इतर दोघे दुकानाच्या शेजारीच रक्त बंबाळ अवस्थेत पडले होते. या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसराला हादरा बसला. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी सातारकरांनी प्रचंड गर्दी केली. घटना घडताच पोलिसांनी समर्थ मंदिर कडून पोवई नाक्याकडे येणारे रस्ते बंद केले होते.
