सायगाव बाजारपेठेत इंटरनेट वायर मुळे धोकादायक परिस्थिती
जावळी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सायगाव येथे वीज तारा तसेच नेटच्या भल्यामोठया जाड असलेल्या वायर तारांचे मोठे जाळे पसरले आहे. ते धोकादायक स्थितीत असल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गावोगावच्या ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्यासाठी असलेल्या वायरी विजेच्या खांबाला असल्याने खांब देखील कलले आहेत.
आनेवाडी सायगावं विभागातील ही मुख्य बाजारपेठ मानली जाते. येथे राष्ट्रीय बँक,जिल्हा बँक,पतसंस्था, शाळा,कॉलेज,महाविध्यालय, दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, हॉटेल, तसेच रोज भरणारी भाजी मंडई देखील असल्याने येथे रोज मोठी वर्दळ असते.हजारो लोक. कामानिमित्त, खरेदीनिमित्त, व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त येथे येजा करत असतात. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळच अनेक व्यवसाय आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता देखील आहे. मुख्य रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमीच वाहतूक खोळबलेली पाहवयास मिळत असते.
मात्र या ठिकाणी खरी धोकादायक परिस्थिती म्हणजे विजवाहक तारा व गावागावात विजेच्या खांबाला जोडल्या गेल्यामुळे ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्यासाठी असलेल्या नेटच्या जाड वायरीमुळे खांब वाकले असून अशा ठिकाणी धोकादायक परिस्थिती झाली आहे. या मोठ्या जाड तारा निसटल्यामुळे अगदी खाली आल्या आहेत. जर एखादे मोठे वाहन आल्यास नक्कीच या तारा वाहणात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विजेचे खांब देखील पडू शकतात.
या मार्गावरून अनेक अधिकारी ये जा करत असतात. मात्र त्यांच्या निदर्शनास या गोष्टी का येत नाहीत हेच समजत नाही. जर येथे या मुळे एखादी मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून होत आहे.जावळी तालुक्यात अशा अनेक गावात या वायरिंची अशीच परिस्थिती असून काही ठिकाणी या वायरी पूर्णपणे जमिनीवर आल्या आहेत. मात्र तरीदेखील याकडे कोणीही गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे. सबंधित कंपनीने या वायरी जोडताना कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसत आहे.
सायगाव ही मुख्य बाजारपेठ आहे.त्यापुढे जवळपास 20 ते 25 गावे, वाड्या,वस्त्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होत असते. अशा प्रकारे मुख्य बाजारपेठेत धोक्याची परिस्थिती असूनही सबंधित दुर्लक्ष करत आहेत. तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक, प्रवाशी यांच्या कडून होत आहे.
