डंपर चालकाने 9 जणांना चिरडले…3 जणांचा जागीच मृत्यू
पुण्यातल्या वाघोली येथे केसनंद फाट्याजवळ भीषण अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून 6 जण गंभीर जखमी आहेत.
या प्रकरणात डंपर चालक गजानन तोट्रे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालक गजानन तोट्रे हा नांदेडचा असून अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे मूळचे अमरावतीचे आहेत. ही घटना रात्री 12 च्या सुमारास घडली आणि त्यानंतर जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले.हे सर्व कामगार आहेत व कामासाठी ते रविवारी रात्रीच पुण्यात आले होते.पुणे पोलिसांकडून अपघात स्थळाची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता त्याने नशेत डंपर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर घातला त्यानंतर बाजूच्या लोकांमध्ये आरडाओरड झाली. त्यामुळे शेजारी असलेल्या पंधरा सोळा कामगारांचा जीव वाचला.
अपघातात जागीच मृत्यू झालेल्या तिघांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असून वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष), वैभव रितेश पवार वय (2 वर्ष), व विशाल विनोद पवार वय (22 वर्षे) अशी नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या 6 जणांमधील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जानकी दिनेश पवार, रिनिशा विनोद पवार, रोशन शशादु भोसले, नगेश निवृत्ती पवार, दर्शन संजय वैराळ, अलिशा विनोद पवार अशी जखमींची नावे आहेत.
