युनेस्कोने केले प्रतापगड संवर्धनाचे कौतुक
सातारा जिल्यातील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडाला युनेस्को च्या पथकाने शुक्रवारी भेट दिली. प्रतापगडाची केलेली जपणूक पाहून युनेस्कोच्या पथकाने सेवेकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी किल्ले प्रतापगडावरील मुख्य बुरुज, चोर वाटा, मंदिर तटबंदी , तलाव, किल्ल्यावरील दरवाजा व अन्य बाबींची पाहणी केली. साडे तीनशे वर्षांनतरही सेवेकऱ्यांनी गडाची योग्य रितीने देखभाल केली आहे. त्याचप्रमाणे सण व उत्सवांची परंपरा अबाधित ठेवली आहे.
प्रतापगडाची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे पथक पुणे जिल्ह्याचा दौरा आटोपून सातारा जिल्ह्याकडे येण्यासाठी रावाना झाले.सकाळी 9 वाजता हे पथक किल्ल्यावर दाखल झाले. या सोबतच दिल्ली व महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तामिळनाडू मधील जिंजी आणि महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करावा असा प्रस्ताव केंद्रसरकारने ‘युनेस्कोला’ पाठवला . या यादीत साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. पथकाच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्यावरील सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर मंदिराचे सेवेकरी , पालखीचे भोई, किल्लेदार त्याचसोबत तरुणांशी संवाद साधला व त्यांना प्रश्नही विचारले. तेथील तरुणांचे पोट या पर्यटन व्यवसायावर निर्भर आहे.
या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला नव्याने समजेल. पर्यटन व्यवसायाचा विकास होईल व रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल.
या पथकाने किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानाच्या कबरीची सुद्धा पाहणी केली.
