महत्त्वाच्या बातम्या

CJP च्या ‘संसद मार्च’मुळे दिल्लीत हाय अलर्ट; ५ हजार जवान तैनात

नवी दिल्ली:

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत सुरक्षेचा प्रचंड मोठा ताण निर्माण झाला आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपी पक्षाने ‘संसद मार्च‘ची घोषणा केली आहे. या आंदोलनात हजारो तरुण सहभागी होण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलिसांकडून शहरात ‘हाय अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी निमलष्करी दलांसह ५ हजारांहून अधिक सुरक्षा जवानांना संपूर्ण शहरात तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने नवी दिल्ली परिसराची १५ विशेष झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

संसद भवन, इंडिया गेट आणि अत्यंत संवेदनशील व्हीव्हीआयपी (VVIP) क्षेत्रांमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी BNSS च्या कलम १६३ अंतर्गत संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की, या निषेध मोर्चासाठी आयोजकांकडून कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही आणि पोलिसांनीही अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. जंतर-मंतर व्यतिरिक्त शहरात इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि या विनापरवानगी आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व मुख्य रस्त्यांवर आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, पोलीस प्रशासन कालपासूनच संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या या तणावपूर्ण वातावरणामुळे दिल्लीतील सुरक्षायंत्रणा पूर्णपणे सतर्क मोडवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!