म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई! मेंढपाळ व शेतकरी महिलांना लुटणाऱ्या परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
सातारा :
म्हसवड आणि अकलूज परिसरात शेतात काम करणाऱ्या व मेंढ्या चारणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना मारहाण करत सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात परजिल्ह्यातील टोळीचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यावधीत खळबळ उडाली असून, पोलिसांनी या टोळीकडून जबरी चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नेमकी घटना कशी उघडकीस आली?
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरताव आणि भाटकी गावाच्या शिवारात काही महिला रानात मेंढ्या चारत होत्या व शेतात काम करत होत्या. या एकाकी महिलांना हेरून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने बळकावले. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे ४ गुन्हे दाखल झाले होते. आरोपींनी एकूण २६ ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले होते.
सराईत गुन्हेगार छुप्या पद्धतीने वावरत असल्याने पोलिसांसमोर त्यांचा शोध घेणे मोठे आव्हान बनले होते. मात्र, एका गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांच्या हाती आरोपींच्या मोबाईलमधील अवघ्या २ सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ लागला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कसून तपास सुरू केला. मात्र, तपासात आरोपींनी वापरलेल्या मोटारसायकलचा नंबर बनावट असल्याचे समोर आले, ज्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला.
पोलिसांची विशेष मोहीम आणि धडाकेबाज अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली.
तांत्रिक विश्लेषणाचे आणि खबऱ्यांच्या माहितीचे जाळे पसरवून म्हसवड पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना जेरबंद केले. खालील दोघांना ताब्यात घेण्यात आले:
१. इरफान उर्फ सोन्या नझीर मुल्लाणी (वय २३ वर्षे, रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे)
२. विजय उर्फ भैय्या सतीश जाधव (वय २२ वर्षे, रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे)
मुद्देमाल हस्तगत आणि उघड झालेले गुन्हे
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या दोन्ही आरोपींनी म्हसवड हद्दीतील गुन्ह्यांबरोबरच अकलूज पोलीस ठाणे हद्दीतीलही जबरी चोरीच्या २ गुन्ह्यांची कबुली दिली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्हेगारांकडून एकूण:
३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ६ लाख रुपये)
गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकल
२ मोबाईल फोन
असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरीत्या जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे हे करत आहेत.
म्हसवड पोलिसांच्या या उल्लेखनीय आणि तपासातील सतर्कतेमुळे परिसरातील शेतकरी आणि महिला वर्गामध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच धडकी भरली आहे. या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हसवड पोलिसांच्या संपूर्ण पथकाचे जाहीर अभिनंदन केले आहे.
