अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू
तडवळे : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दुःखद घटना समोर आली आहे. तडवळे येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय 45) या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. सुनंदा या शेतात मोलमजुरीचे काम करत होत्या. ही घटना सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडली. याबाबत सुनंदा यांचा पुतण्या सूरज महादेव पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. मृत महिलेचे पती महादेव पाटील यांचे दहा वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. या घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीचे निधन झाल्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सुनंदा यांच्यावर होती. सुनंदा पाटील यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आज सुनंदा पाटील सकाळी शेतामध्ये गेल्या असता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.जोराचा वारा व वादळ सुटल्याने त्या घरी जाण्यास निघाल्या असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
