आंदेकर टोळीवर पोलिसांचा दणका; कुख्यात अक्षय अकोलकर नाना पेठेतून अटकेत
पुणे: पुणे शहर आणि परिसरातील संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने नाना पेठ परिसरातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी कुख्यात बंडू आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षय दशरथ अकोलकर (वय ३३, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव असून, त्याच्याकडून एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार शहरात रात्रीची गस्त घाकत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा कडून महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नागझरी नाल्या शेजारी अक्षय अकोलकर हा संशयास्पद रीतीने थांबला असून त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती समजली. या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक धारदार कोयता सापडल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार महेंद्र तूपसौंदर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या अक्षय अकोलकर याच्या विरुद्ध यापूर्वीही समर्थ पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या अभिलेखावरून समोर आली आहे. बंडू आंदेकर टोळीच्या नावाखाली परिसरात दहशत माजविण्याचा आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचा त्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या शस्त्राबाबत आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत असून, पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगार व समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.
