आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे येथे क्रीडा दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक सर्वोच्च ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी घडविला. स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना पैसे नव्हते. लोकांकडून पैसे गोळा करून निधी जमवला व स्पर्धेत सहभागी झाले आणि देशाला पदक मिळविले. त्यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संघर्षमय जीवनातून ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. असे उदगार श्री संजय नलवडे माजी मुख्याध्यापक अजिंक्यतारा विद्यामंदिर शेंद्रे यांनी काढले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, नागठाणे या महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उदघाटन व खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
मा. श्री संजय नलवडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आज सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत मात्र विद्यार्थ्यांच्यात वाचन व खेळाची आवड कमी झाली आहे. ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे आणि महाविद्यालयाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले, ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये मिळवलेला विजय हा भारत देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट ठरली. त्यानंतर देशाला फार वर्षांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळाले. आज क्रीडा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी या पंधरवड्यात ग्रंथदान , ग्रंथवाचन व ग्रंथ प्रदर्शन या उपक्रमाबरोबरच काव्यवाचन, निबंध, वक्तृत्व , पुस्तक परीक्षण, स्पर्धा व व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. स्मिता कालभूषण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शितल सालवडगी यांनी केले. तर आभार डॉ. लक्ष्मण दोडमणी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माननीय श्री रमेश साळुंखे पाटील, पोलीस पाटील , विजय कदम, विनामूल्य निरंतर पाणीपुरवठा, श्री बाळासाहेब पवार माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी, नागठाणे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
