महत्त्वाच्या बातम्या

आर.एस.एस च्या स्वयंसेवक ते दिल्लीच्या मुख्यमंत्री –रेखा गुप्ता

      तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची वर्णी लागली. रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणा राज्यातील  जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात 1974 साली झाला.
त्या फक्त 2 वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंब 1976 साली दिल्लीत स्थायिक झाले. शालेय शिक्षण चालू असतानाच त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेल्या.1992 साली दिल्ली विद्यापीठातील दौलतराम कॉलेजमध्ये प्रवेश करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (A.B.V.P)मध्ये सहभागी होऊन आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
          परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आणि समस्या सोडविल्या, यामुळे त्या विद्यार्थी  प्रिय नेत्या आणि विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज बनल्या. यामुळे 1994–95 मध्ये कॉलेज सचिव, 1995–96 दिल्ली विद्यापीठाच्या छात्र संघाच्या सचिव, 1996–97 छात्र संघाच्या अध्यक्षा,2003–04 भाजपच्या दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव, 2004–06 युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव, एप्रिल 2007 उत्तरी पितमपुरा वार्ड मधून भाजपच्या नगरसेविका,2007–09 महिला कल्याण आणि बाल विकास समिती अध्यक्षा ,2010–भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या झाल्या. सध्या त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. 2015 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांनी 11000 मतांनी तर 2020 मध्ये 3440 मतांनी पराभूत केले. 2025 मध्ये झालेल्या शालिमार विधानसभा मतदारसंघातून त्यांनी वंदना कुमारी यांचा 29595 मतांनी पराभव केला. याचबरोबर त्या प्रथमच आमदार म्हणून निवडून येऊन दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री तर देशातील आठराव्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

         भाजपच्या महिला विषयक राजकीय रणनीतीचा विचार करता असे दिसून येते, भाजप महिलांच्याकडे एक महत्त्वपूर्ण व्होट बँक म्हणून पाहत  आहे. कारण 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवून  महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत, प्रत्येक होळी आणि दिवाळी या सणांना एक सिलेंडर मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले. गुप्ता यांच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही होते आणि त्यांच्या सूचनेनंतरच रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं मानलं जातं. याची अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे रेखा गुप्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी असणारी जवळीक. आणि  दुसरे कारण म्हणजे रेखा गुप्ता या वैश्य समाजाच्या असून दिल्लीत  असणारा जवळपास आठ टक्के वैश्य समाज हा भाजपच्या पाठीशी उभा रहावा. व भविष्यातील भाजपचे राजकारण यशस्वी व्हावे. हाच यामागचा उद्देश असावा. 

        असे असले तरी देखील दिल्ली वासियांच्या अनेक समस्या आहेत यात ढासळणारी हवेची गुणवत्ता म्हणजेच वायु प्रदूषण ही दिल्लीवासीयांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे कारण. लहान मुले ,वयस्कर माणसे यांना वायु प्रदूषणामुळे दररोज श्वास घेणे, घशातील संसर्ग, डोळ्याची जळजळ अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तसेच राजधानी दिल्लीतील भीषण रूप धारण करत असलेली कचरा समस्या ही देखील चिंतेची बाब आहे ,सन 2015 साली या कचऱ्यामुळे डेंग्यू होऊन सात वर्षे बालकाचा मृत्यू ,तसेच दिल्लीतील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे यमुना नदीच्या पाणलोट क्षेत्राचा विविध भागातून नाल्यातून येणारा 58% कचरा या नदीत मिसळत आहे. यामुळे दिल्लीवासीयांना पाणी प्रदूषणामुळे गंभीर स्वरूपाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी यमुना शुद्धी करण्यासाठी मोहीम हाती घेऊन विविध प्रकल्प व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रेखा गुप्ता या समस्यांचा निपटारा करण्यात किती यशस्वी होतील हे येत्या काळात समजेल ,या समस्यावर दिल्ली शासनाने उपाय काढले तरच दिल्लीवासीयांच्या मताला भाजपने न्याय दिला असे समजण्यात येईल व  भाजपला दिल्लीत आपली सत्ता पुन्हा स्थापन करण्यात यश मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!