महत्त्वाच्या बातम्या

दोन दिवसातच घरवापसी: दबावाखाली अजित पवार गटात गेलेल्या अभिजीत पवारांचा खळबळजनक खुलासा

      राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांनी मंगळवारी दि. १८ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत अभिजीत पवार यांनी गुरुवारी पुन्हा शरद पवारांच्या गटात परत येत खळबळ उडवून दिली.

       ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत पवार यांनी मोठे आरोप करत सांगितले की, “माझ्यावर जबरदस्त दबाव टाकण्यात आला होता. केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठी माझा वापर केला जात होता. जर आव्हाड यांचा फोन आला नसता, तर मी आत्महत्या केली असती!” अभिजीत पवार यांनी स्पष्ट केले की, अजित पवार गटात सामील होण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता. “माझ्यावर गुन्हे दाखल करून मला दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्याचे नियोजन सुरू होते. पोलिस आणि काही मित्रांच्या मार्फत धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो होतो. नजीम मुल्ला नावाच्या व्यक्ती मार्फत मला धमक्या दिल्या गेल्या,” असा धक्कादायक आरोप त्यांनी केला.

      केवळ दोनच दिवसांपूर्वी अभिजीत पवार यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र, तात्काळ परिस्थिती बदलली आणि त्यांनी पुन्हा शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली. यावेळी त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले, “आजपासून मी शेवटच्या श्वासापर्यंत जितेंद्र आव्हाड यांच्याच सोबत राहणार आहे!”हा घडलेला प्रकार राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करणारा ठरला असून, दबावाखाली पक्ष बदलले जात असल्याचा गंभीर आरोप अभिजीत पवार यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या प्रकरणावरून नवे वादळ उठण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!