कवठे, वाई येथे शेतकऱ्यांच्या श्रमदानातून खुल्या झालेल्या पाणंद रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
सातारा: वाई तालुक्यातील कवठे (डुक्कर जाई शिवार) येथील शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व शासनाच्या सहकार्याने श्रमदान करून खुला केलेल्या पाणंद रस्त्याची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली. या पाहणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
परिसरातील शेतीपयोगी कामे, वाहतूक, शाळा–रुग्णालयाला जाणे–येणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याची ग्रामस्थांनी मोठ्या एकजुटीने निर्मिती केली आहे. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करून रस्ता पक्का करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी देवून हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्याला एक आदर्शवत असेल असे गौरव उद्गार देखील त्यांनी काढले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे रस्त्याचे पक्कीकरण लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
