कास पठार नजीकच्या दरीत आढळला मृतदेह
साताऱ्याच्या पश्चिमेकडील भागात कास पठार नजीक असलेल्या कास ते बामणोली रस्त्यावर अंधारी (ता.जावली) गावच्या हद्दीत आडवीरा नावाच्या शिवारात तीस ते पस्तीस वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह सकाळी आढळून आला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी मेढा पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर सदर घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली. सदर मृतदेह अंधारी गावचा रहिवासी असलेल्या संजय गणपत शेलार(वय ३२)यांचा असल्याचे समजले.
घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन न झाल्याने नेमका मृत्यू कसा झाला हे स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसत असून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळापासून पूर्वेला कास पठार मोठ्या अंतरावर आहे. त्या दिशेला घनदाट जंगल आहे. कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही. त्यामुळे गावानजिकच मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत मेढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, मयत संजय शेलार हा वाई तालुक्यातील एका गावात हाॅटेलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाॅचमन म्हणून काम करत असून तो कुटुंबासह तिकडेच राहत आहे. दोन दिवसांपूर्वी गावाला जातो असे सांगून तो अंधारी कडे आला होता. पण थेट त्याचा मृतदेह आढळल्याने नेमका त्याचा मृत्यू कशाने झाला आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
