कृष्णानगर येथे पर्यावरणपूरक होळी ; पोळी दान उपक्रम यशस्वी
सातारा : कृष्णानगर येथील आदित्यनगरी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत परिसरातील कचऱ्याचे संकलन करून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोसायटीतील महिलांनी पोळी दान उपक्रम यशस्वीपणे राबविला.
… होळीचा पारंपरिक सण साजरा करताना अनेक झाडे पाडून ती जाळण्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा विचार करून कृष्णानगर येथील आदित्यनगरी गृहनिर्माण सोसायटीत नागरिकांनी परिसरातील कचरा गोळा करून त्याची होळी केली. तर महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुरणपोळी दान उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. संकलीत झालेल्या सुमारे ६० पुरणपोळया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुरणपोळ्या खेड येथील कातकरी समाजबांधवांना वाटप केल्या. गरजू व भुकेलेल्या लोकांच्या पोटात पोळ्या गेल्याने या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
