महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पाऊस! राधानगरी धरण ७१% भरले,१५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम असून, यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील राधानगरी धरणातील पाणीसाठा ७१ टक्क्यांवर पोहोचला असून, इतर बहुतांश धरणेही ६० ते ७० टक्के भरली आहेत. या संततधार पावसामुळे पंचगंगा, कासारी आणि भोगावती नदीवरील एकूण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात सरासरी २६.६ मिमी पावसाची नोंद झाली असून पंचगंगा नदीची पातळी २४.५ फुटांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील राधानगरी, कुंभी, चिकोत्रा आणि कोदे परिसर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळकासारी नदीवरील बाजारभोगाव, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, वालोली व यवलूजतसेच भोगावती नदीवरील सरकारी कोगे व खडक कोगे हे १५ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्याजवळ नदीची पातळी २४.५ फुटांवर गेली असून तेथून १८,६५५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखल्या असून पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि पुराचे पाणी असणाऱ्या रस्ते व बंधाऱ्यांवरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!