कोल्हापुरात शिवाजी पाटलांच्या मिरवणुकीत आगीचा भडका
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल दिनांक २३ रोजी जाहीर झाला. जे उमेदवार निवडणूक जिंकले त्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. परंतु काल कोल्हापुरात मिरवणुकी दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.चंदगड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या मिरवणुकीमध्ये आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये काही महिला होरपळून निघाल्या आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नागेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून नंदाताई उर्फ नंदिनी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या दोघांना पराजित करत शिवाजी पाटील यांनी कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 24 हजार 134 मतांनी विजयी मिळवला.
विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची महागाव येथे मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत काही महिला त्यांचे औक्षण करण्यासाठी जमल्या होत्या. यावेळी ही घटना घडली.या मिरवणुकीत कार्यकर्ते जेसीबीने गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करत होते. हाच गुलाल औषध करणाऱ्या ताटातल्या दिव्याच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला.यामध्ये 34 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान कोल्हापुरात सर्वच 10 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.
